
मुंबई प्रतिनिधी
धारावीतील शताब्दी नगरमधील रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली. तयार घरांचा ताबा अद्याप न मिळाल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत त्यांच्या घरांचा ताबा देण्याची मागणी केली.
शताब्दी नगरमधील अनेक घरांचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप रहिवाशांना त्या घरांचा ताबा मिळालेला नाही. अदानी समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कारभारावर रहिवाशांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “हे सगळं मुद्दाम केलं जात आहे, जेणेकरून अदानी समूह या घरांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू शकेल आणि मूळ घर मालकांना दूर ठेवत असल्याचे नागरिकांनी सांगितले”
रहिवाशांन सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे या आधीही अनेक वेळा तक्रारी केल्या, भेटी घेतल्या. मात्र दरवेळी केवळ नवीन तारीख देऊन वेळकाढूपणा करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या आठवड्यात या घरांवर नवीन नोटीसा चिकटवण्यात आल्या असून त्यात पात्रतेच्या नव्या सर्व्हेमध्ये पुन्हा सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे रहिवाशांमध्ये अधिकच असंतोष पसरला आहे.
आज झालेल्या आंदोलनादरम्यान शताब्दी नगरच्या शिष्टमंडळाने DRP कार्यालयात उपस्थित राहून सीईओ श्रीनिवास यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयाकडून ते ‘मीटिंग’मध्ये असल्याचे सांगण्यात आले.
“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि आम्हाला आमच्या घरांचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
हे आंदोलन खा वर्षाताई गायकवाड,आ डॉ. ज्योती गायकवाड काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रहिवाशांनी सरकारकडे आणि प्रशासनाकडे याप्रकरणात त्वरित लक्ष घालण्याची आणि न्याय देण्याची मागणी केली आहे.