
मुंबई प्रतिनिधी
पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मुंबईकरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.
मुंबईत एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरुन जाऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या मुंबई शहरात एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने या काळात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, रविवारी केईएम हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, दोन्ही रुग्णांचा मृत्यू सहव्याधीमुळे झाल्याचे केईएमच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून रुग्णांसाठी विशेष तयारी
मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष बेड्स आणि खासगी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 20 MICU बेड्स, महिला व बालरुग्णांसाठी 20 बेड्स, सामान्य लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णासाठी 60 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे,चिंचपोकळी येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 2 ICU बेड्स, 10 बेड्सचे विशेष कोरोना वॉर्ड असून, गरज भासल्यास तत्काळ या क्षमतेत वाढ करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
‘घाबरू नका मास्क वापरा…
सन 2025 सालातील जानेवारी ते एप्रिल या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूपच कमी होती. मात्र, मे महिन्यापासून काही रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे BMC प्रशासन सातत्याने निगराणी ठेवत असून नागरिकांनी घाबरू नये, मास्क वापरावा, असे आवाहन BMC च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
यांना धोका जास्त..
कॅन्सर, वयोवृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच यकृताचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त आहे. अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खबरदारी घ्या…
कोरोनाचा विषाणू आता क्षीण झाला आहे. तो पुन्हा आला असला तरी तो तितका नुकसानदायक नाही. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. पण कोरोनाचा विषाणू पसरणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहेत, असा सल्ला विशेषाज्ज्ञांनी दिला आहे.
कोविड-19 ची लक्षणे:
* ताप
* कोरडी किंवा कफसह खोकला
* घशात खवखव किंवा दुखणे
* थकवा, अंगदुखी, डोकेदुखी
* सर्दी, नाक वाहणे
* चव किंवा वास न येणे
या लक्षणांची तीव्रता व्यक्तीनुसार बदलू शकते. श्वास घेण्यात त्रास होणे हे गंभीर लक्षण मानले जाते आणि अशावेळी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.