कल्याण प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते.
त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोन्ही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील. चेन्नई पॅटर्न बोलत आहेत पण कल्याण डोंबिवली आता एक नंबर ला आले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ सोहळा रविवारी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र चव्हाण, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, पालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, टाटाचे सुशील कुमार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केले.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, टाटा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सात हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून त्यात रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजनस आणि ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देण्यात येणार आहे असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.


