पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमध्ये अमानुष प्रकार, 8 कुत्र्यांचा मृत्यू; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड
पुणे| पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये 13 एप्रिल रोजी घडलेल्या भटक्या कुत्र्यांच्या विषप्रयोग प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी अलौकिक राजू कोटे (वय अंदाजे 30) या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर निर्दयीपणे भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
सोसायटीच्या परिसरात राहणाऱ्या या आरोपीने तब्बल 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, अलौकिक कोटे पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून सोसायटीच्या आवारात अनेक वेळा फिरताना दिसतो. त्याच्यामागे काही भटकी कुत्री धावताना देखील दृश्ये कैद झाली आहेत.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपीने आपल्या मोबाईलवर भटक्या प्राण्यांना विष देण्यासंबंधी गुगलवर शोध घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यावरून आरोपीने योजना आखूनच हा कृत्य केल्याचा संशय अधिक बळावला आहे.
मात्र, अलौकिक कोटेने असे अमानुष कृत्य का केले, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून यासंबंधी सखोल तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट असून, प्राणीमित्रांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत असून, आरोपीविरोधात प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


