
सुकमा (छत्तीसगड) | प्रतिनिधी
छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेजवळील करेगुट्टा टेकडीवर सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) एका श्वानाचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ‘रोलो’ नावाची दोन वर्षांची ही मादी श्वान स्फोटक शोधण्याच्या कामात तैनात होती.
११ मे रोजी संपलेल्या २१ दिवसांच्या मेगा ऑपरेशन दरम्यान, २७ एप्रिल रोजी विशेष कारवाईनंतर परतताना रोलोवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. जवळपास २०० मधमाशांनी डंख केल्यानंतर ती अॅनाफिलेक्टिक शॉकमुळे बेशुद्ध पडली. प्रशिक्षकाने तिला पॉलिथिन शीटने झाकण्याचा प्रयत्न केला, पण तीव्र वेदनेमुळे रोलोने कव्हरमधून बाहेर पडल्याने मधमाशांनी पुन्हा हल्ला केला.
#WATCH | CRPF personnel conduct last rites of K9 Rolo of 228 Bn in Sukma district of Chhattisgarh. The 2-year-old Rolo was declared dead on 27 April 2025, with the cause of death being anaphylactic shock following 200 bee stings.
Rolo and her handler were attacked by a swarm of… pic.twitter.com/qepVCLmcz9
— ANI (@ANI) May 16, 2025
रोलोला तत्काळ घटनास्थळावरून बाहेर काढून प्राथमिक उपचार देण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. रात्री १२.२५ वाजता रोलोला अधिकृतरीत्या मृत घोषित करण्यात आले. तिच्या शौर्याची दखल घेत सीआरपीएफच्या महासंचालकांनी तिला मरणोत्तर प्रशंसा पदक बहाल केले आहे.
कर्नाटकातील बंगळुरूजवळील तारालू येथील सीआरपीएफ डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षित झालेल्या रोलोची छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी तैनाती करण्यात आली होती. करेगुट्टा टेकडीवरील घनदाट जंगल, नक्षलवादी हालचालींसाठी प्रसिद्ध असून येथे अस्वल, कीटक आणि मधमाशांसारखे अनेक वन्य जीव आढळतात.
रोलोने दिलेल्या शौर्य आणि सेवेला देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. सुरक्षा दलाच्या प्रत्येक सदस्यासोबत त्यांचे श्वानही जीव ओवाळून टाकत सेवा बजावत असतात, याचे हे हृदयस्पर्शी उदाहरण ठरले.