
मुंबई प्रतिनिधी
मुंबई| पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना जबर धक्का बसला असून, देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराने बजावलेली भूमिका अत्यंत गौरवास्पद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या यशाबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान येथे भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. तिरंग्यांच्या लाटांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी लष्कराच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय लष्कराच्या या धाडसी कारवाईमुळे देशवासीयांचा आत्मविश्वास वाढला असून, अशा रॅलीच्या माध्यमातून आपण आपल्या जवानांना पाठबळ देत आहोत.”
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण असून, तिरंगा रॅलीतून मुंबईने आपल्या देशप्रेमाची ठोस भूमिका अधोरेखित केली.