
मुंबई प्रतिनिधी
मुंबई| सायबर गुन्हेगार सतत नवीन फसवणुकीच्या पद्धती शोधून काढत असून, आता त्यांनी जनतेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नवीन युक्ती अवलंबली आहे. आता फक्त लिंक किंवा कॉल नव्हे, तर एक साधा फोटोही तुमच्या बँक खात्यावर घाला घालू शकतो.
नवीन फसवणुकीच्या प्रकारात गुन्हेगार व्हॉट्सअॅपसारख्या लोकप्रिय मेसेजिंग अॅपचा वापर करून मॅलवेअरयुक्त फोटो पाठवत आहेत. अनोळखी नंबरवरून आलेल्या फोटोवर क्लिक करताच युजरच्या मोबाईलमध्ये धोकादायक सॉफ्टवेअर – मॅलवेअर – इंस्टॉल केलं जातं. यामुळे फोनवरील नियंत्रण गुन्हेगारांकडे जातं आणि बँकिंग अॅप्स, पासवर्ड, फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन यांसारख्या संवेदनशील माहितीचा गैरवापर होतो.
सायबर गुन्हेगार युजरची ओळख चोरी (ID Cloning) करून बनावट सोशल मीडिया प्रोफाइल्स किंवा बँक खाती देखील तयार करू शकतात. या माहितीचा वापर इतर सायबर गुन्ह्यांमध्येही केला जातो.
काय खबरदारी घ्यावी?
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला फोटो, फाइल किंवा लिंक तपासल्याशिवाय उघडू नका.
अॅप्स केवळ अधिकृत प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा.
बँकिंग अॅप्ससाठी मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.
कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा.
सतर्क राहा, सुरक्षित राहा! सायबर सुरक्षेसाठी प्रत्येकाने सजग असणे ही काळाची गरज आहे.