
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |मुंबई शहराच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक ५ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उड्डाण साधनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून पवई परिसरात ड्रोन उडविल्याप्रकरणी एका २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त (अभियान) यांच्या कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादी उड्डाण क्रियांना सक्त मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरक्षा कारणास्तव करण्यात आली असून, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (DGCA) ने मुंबईतील अनेक भागांना “रेड झोन” म्हणून घोषित केले आहे.
तरीही दिनांक १२ मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने बेकायदेशीरपणे ड्रोन उडवले. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी वरील बंदी आदेशाचे तंतोतंत पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, कुणीही ड्रोन उडवत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ १०० किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.