
मुंबई प्रतिनिधी
मुंबई| मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज खळबळ उडवणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये पुढील दोन दिवसांत मोठ्या बॉम्बस्फोटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाने हा ईमेल प्राप्त होताच तो संबंधित यंत्रणांकडे पाठवला. मेलमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
धमकीचा स्रोत शोधण्यासाठी सायबर सेल सक्रिय झाला असून, ईमेल पाठवणाऱ्याचा पत्ता आणि आयडी ट्रॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप पाठवणाऱ्याचे स्थान निश्चित करण्यात यश आलेले नाही.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, धमकी देणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.