मुंबई प्रतिनिधी
बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) मधील अंतर्गत रस्त्यांचा वापर केवळ पूर्व किंवा पश्चिम उपनगरांत जाण्यासाठी करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्क (Congestion Charges) भरावा लागू शकतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने (म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने) सिंगापूर आणि युरोपमधील मॉडेलच्या धर्तीवर हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसीत ५० मिनिटांपेक्षा कमी वेळासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनावर शुल्क आकारण्याचा विचार आहे. दररोज जवळपास २ लाख कर्मचारी आणि ४ लाख अभ्यागत बीकेसीत येतात. याशिवाय अनेक वाहनं बीकेसीमधून फक्त ‘शॉर्टकट’ म्हणून कनेक्टर रस्त्यांचा वापर करून उपनगरात जातात. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते.
कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने हा शुल्काचा पर्याय समोर आणला आहे. मात्र, बीकेसीमध्ये नियमित येणाऱ्या वाहनांना यामधून सूट दिली जाणार असून, त्यासाठी अशा वाहनांची नोंदणी करण्यात येणार आहे.
या प्रस्तावासाठी सविस्तर धोरण तयार करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून, त्याद्वारे सुसाध्यता अभ्यासून शुल्काची रक्कम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित केली जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या अलीकडील बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे बीकेसी परिसरातील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


