
मुंबई प्रतिनिधी
पोलिसांचा धाक आता उरलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना मुंबईच्या पायधुनी परिसरात घडली आली आहे. एका कारागिराच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात गेलेल्या तिघांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायधुनी परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यातील एका कारागिराने कारखान्याचा कचरा खाली, चौथ्या मजल्यावर आणून ठेवल्याने गोदाम मालकाने त्याला जाब विचारला. त्यावरून कारागिराने शिवीगाळ करत धमकावल्याने गोदाम मालकाने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या कारागिराच्या समर्थनासाठी तिघे जण पोलीस ठाण्याबाहेर आले होते. मात्र तेथे उभे राहून गोंधळ घालू लागल्याने तेथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा राग येऊन या तिघांनी सय्यद यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली.
काही दिवसापूर्वी सांताक्रुज पोलीस स्टेशन येथेही अशी घटना घडली होती उपनिरीक्षकाना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता
या प्रकारामुळे पोलीस दलात संताप व्यक्त होत असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.