
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने मुंबईत वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, या प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रोला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या महिन्याच्या अखेरीस DPR तयार होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पासाठी विशेष संस्था
नितेश राणे म्हणाले की, डीपीआर महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 भागीदारी अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाईल, यासाठी एक विशेष संस्था स्थापन केली जाईल. मुंबई ही सात बेटांनी बनलेली असूनही जलमार्गांचा आतापर्यंत पूर्ण वापर झाला नाही. वॉटर मेट्रोमुळे रस्ते आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल.
प्रकल्पाचा तपशील असे टप्पे
कोची वॉटर मेट्रो या प्रकल्पाला तांत्रिक सहाय्य पुरवत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या बोटी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) विविध भागांना जोडतील. वैतरणा नदी, वसई, ठाणे, मनोरी, पनवेल आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात 21 संभाव्य स्टेशन ओळखली गेली आहेत. हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जाईल: पहिल्या टप्प्यात वॉटर मेट्रो आणि दुसऱ्या टप्प्यात रो-रो फेरी सेवा सुरू होईल.
नवी मुंबई विमानतळावर वॉटर टॅक्सी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नवी मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल जिथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू होईल अशी घोषणा केली होती. नवी मुंबई विमानतळाजवळ वॉटर मेट्रो टर्मिनल बांधण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सिडको, महाराष्ट्र सागर मंडळ (MMB) आणि राज्य बंदर मंत्रालय यांच्यात लवकरच बैठक होईल आणि DPR तयार केला जाईल.
पर्यटनाला चालना, जलमार्ग व्यवस्थापन
प्रस्तावित क्षेत्रांमध्ये आधीच जलमार्ग उपलब्ध असून ही प्रणाली 3 ते 3.5 मीटरच्या भरती-ओहोटी फरकांचे व्यवस्थापन करेल, असेही नितेश राणे म्हणाले. वॉटर मेट्रोमुळे मुंबईच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. किल्ले, पक्षी निरीक्षण केंद्रे, वॉटर पार्क आणि धार्मिक स्थळांना जोडणारे पर्यटन सर्किट यातून विकसित केले जाईल असेही ते म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे वॉटर मेट्रो प्रकल्प देशाच्या आर्थिक राजधानीत पर्यटनालाही एक नवा आयाम मिळेल. जलसाठ्यांची नियमित स्वच्छता करून त्यांची देखभाल केली जाईल. या सेवेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि जलमार्गांचा वापर करून शहरी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.