
पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील बाणेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तडकाफडकी बदल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तसेच, एका सहायक पोलीस निरीक्षक महिलेसह पोलीस उपनिरीक्षक महिलेची बाणेर पोलीस ठाण्यातून गोपनियतेचा भंग केला म्हणून बदली करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. बाणेर पोलीस ठाण्यात कार्यालयाच्या नूतनीकरणावेळी पोलीस अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर एकाच ठाण्यातील तिघांवर बदलीची कारवाई झाली.
बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची नियुक्ती केली.
मागील दीड वर्षांपासून सावंत यांनी शिवाजीनगर पोलीस हद्दीत चांगली कामगिरी बजावली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांची बाणेर पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. तसेच, वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
पोलीस खात्याच्या गोपनियतेचा केला भंग?
बाणेर पोलीस ठाण्यातंर्गत नूतनीकरणाचे काम करीत असताना अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांची झाडाझडती घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकापाठोपाठ सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा दीपक जाधव यांची खडक ठाण्यात तर महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री आर पाटील यांची बाणेरमधून कोर्ट कंपनी आवारात बदली करण्यात आली. पोलीस खात्याअंतर्गत गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.