
पनवेल प्रतिनिधी
राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती, अशी गंभीर टिपणी करत न्यायालयाने ही शिक्षा दिली. या प्रकरणातील सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. मात्र, या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे.
2015 साली नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या महिला अधिकाऱ्याचा गूढ मृत्यू समोर आला होता. ती अचानक बेपत्ता झाली आणि अनेक दिवसांनंतर तिचा तपास सुरू झाला. तपासात समोर आले की, तिची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आला होता. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा खुद्द पोलीस दलात कार्यरत असलेला अधिकारी होता. त्याच्यावर अश्विनीसोबत संबंध होते, मात्र त्यातून निर्माण झालेला संघर्ष आणि दबाव यामुळे त्याने तिची हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं होतं.
कोणाला किती शिक्षा?
अभय कुरुंदकर : जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की, “ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरूपाची होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी फसवणूक करून, नंतर तिचा जीव घेण्याचे कृत्य समाजाला धक्का देणारे आहे.”
महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी 7 वर्षांची शिक्षा
या दोघांवर पुरावे नष्ट करणे, माहिती लपवणे आणि गुन्हेगाराला मदत करणे अशा आरोपांखाली खटला चालवण्यात आला होता. या दोघांनी शिक्षेची मुदत आधीच पूर्ण केल्यामुळे त्यांची लगेचच सुटका होणार आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण काय आहे?
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातील या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला होता.
अश्विनी बिद्रे यांचा 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता.
हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलीस खात्याने पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.