
करवीर प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडा येथे रस्त्याअभावी रुग्ण महिलेला रुग्णालयात आणण्यास खूप उशीर झाला. वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. रस्त्याअभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार, असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील लोकांना विचारला आहे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी आजही शहरापासून वीस-पंचवीस किलोमीटरवरील धनगर वाड्यावर रस्ते नसल्याने नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे. उपवडे पैकी बेंडाई धनगर वाडा (ता. करवीर) येथे शंभर दीडशे लोकसंख्या असलेला धनगरवाडा आहे. तसेच येथील काही घरे पन्हाळा तालुक्यातील गावाला जोडलेली आहेत. यामुळे विकासापासून हे धनगरवाडे कोस दूर आहेत.
दगडूबाई देवणे दुपारी भर उन्हात शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांना चक्कर आली. त्या खाली कोसळल्या. दवाखान्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे स्थानिकांनी त्यांना तातडीने खाटल्यात घालून त्यांना पाचकटेवाडी येथे आणण्यात आले. रस्ता खचल्यामुळे डोंगरातून उतरताना चौघांना अडचणी येत होत्या. यातच वेळ गेला. दवाखान्यात पोहोचण्यास सायंकाळ झाली. दोनवडे येथे त्यांना खासगी रुग्णालयात आणण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
रस्त्याअभावी आणखी किती नागरिक, गरोदर महिलांचा मृत्यू होणार? असा सवाल आज येथील लोकांनी केला आहे. रस्ता नसल्यामुळे गर्भवतींना खाटल्यावरून तीन-चार किलोमीटर डोंगर उतरत आव्हानात्मक पायपीट करीत पाचाकटेवाडी गाठावी लागते, तसेच येथे आणावेही लागते. त्यातच खूप वेळ जात असल्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा दरवर्षी घटना घडतात, पण लक्षात कोण घेतो, असा सवालही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याअभावी आणखी किती लोकांचा मृत्यू होणार, असा प्रश्न आहे. रस्ता नसल्यामुळे गर्भवतींनाही डाल्यात किंवा खाटल्यावरून वस्तीखालील पाचकटेवाडी येथे आणावे लागते. विद्यार्थ्यांना चालत पाचकटेवाडी येथे यावे लागते. यामुळे मुली शिक्षण बंद करतात, असे चित्र आहे.
– पांडू देवणे, ग्रामस्थ