
अकोला प्रतिनिधी
गेले काही दिवसापासून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून पोलीस दलात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे वैयक्तिक कारणास्तव किंवा अन्य अन्यकारणाने पोलीस दलात आत्महत्या होऊ लागले आहेत अशीच घटना समोर आली आहे.
अकोला शहरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगदीश शिंदे हे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.
त्यांनी आपल्या मूळगावी, म्हैसपूर येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने अकोल्यातली सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अकोला पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
जगदीश शिंदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण एएसआयने आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला इतके टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती काय असेल, याबाबत अकोल्यात चर्चा सुरू आहे. जगदीश शिंदे यांचे कुटुंबीय, सहकारी आणि स्थानिकांमध्येही या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. जगदीश शिंदे यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक, कौटुंबिक की कामाच्या ठिकाणी तणाव होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
जगदीश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोला पोलिसांकडून याचा तपास सुरू केला आहे. जगदीश शिंदे यांच्या कुटुंबीयांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी अकोला पोलिस प्रशासनाकडून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.