
पुणे प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण ७९२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत इमाॅन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वऱ्हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.
एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली हेाती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सेवा निवड मंडळाने या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या परीक्षेतील निवडीनंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आणि भारतीय नौदल अकादमीमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड झालेले विद्यार्थी आता भविष्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी होतील.
केंद्र सरकारने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दरवाजे मुलींसाठी उघडले, तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रात झेप घेण्याचा निश्चय केला हाेता. एनडीए प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असते. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जाेरावर तिने हे यश मिळविले आहे. यापूर्वी तिने विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ती एक प्रशिक्षित हार्मोनियमवादक आणि गायिकादेखील आहे. तिचे वडील संदीप वऱ्हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयश्री वऱ्हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत.
हजार मुलींतून अव्वल
एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण हाेणे, त्यानंतर पाच दिवस चालणाऱ्या ताेंडी परीक्षेत यश संपादन कठीण काम आहे. ऋतुजा ही प्रचंड मेहनती मुलगी असल्याने ती यात झेप घेऊ शकली. लेखी परीक्षेला सुमारे दीड लाख मुली हाेत्या. त्यापैकी १ हजार मुलींची ताेंडी परीक्षेसाठी निवड झाली आणि त्यातून ९० मुलींची निवड करण्यात आली. त्यात ऋतुजाने देशात अव्वलस्थान बळकावत पुण्याची मान उंचावली आहे.