
मुंबई प्रतिनिधी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दाते हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA)चे महासंचालक आहेत.
मात्र सदानंद दाते यांच्याकडे २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा यांचा तपास करण्याची जवाबदारी असल्यामुळे केंद्र सरकार त्यांना या जवाबदारीतुन मुक्त करतील का यावर सर्व अवलंबून असेल असे काही आयपीएस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. फणसळकर यांच्या निवृत्ती नंतर रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे आयुक्तपदासाठी दावेकरी असले तरी त्यांच्या पेक्षा वरिष्ठ आईपीएस अधिकारी आयुक्तपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या पाठोपाठ मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजयकुमार वर्मा, संजय कुमार सिंघल, रितेश कुमार आणि अमिताभ गुप्ता यांच्या नावाची चर्चा सुरू असताना अचानक वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
२६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला एनआयए ने अमेरिका येथून भारतात आणले आहे. तहव्वुर राणाला भारतात आणून त्याला अटक केल्यामुळे भारत सरकारचे हे मोठे यश मानले जात आहे. तहव्वुर राणा हा सध्या एनआयए च्या अटकेत असून या केंद्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे आहेत. सदानंद दाते हे मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी स्वतः हजर होते. मुंबईतील कामा रुग्णालयात घुसलेल्या पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांशी त्यांचा सामना झाला होता.
दाते आणि त्याच्यासोबत असलेल्या मूठभर पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक निरपराधाचे प्राण वाचवले होते. या हल्ल्यात दाते हे जखमी झाले होते. तसेच याच हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा सध्या दाते प्रमुख असलेल्या एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असून दाते स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहे. सर्वात प्रामाणिक आणि अत्यंत साधे आयपीएस अधिकाऱ्यांपैकी सदानंद दाते एक आहे. एनआयएमध्ये येण्यापूर्वी ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक होते. सदानंद दाते हे ३१ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत.