सांगली प्रतिनिधी
सांगली : येथील जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा सेवन करताना तीन न्यायालयीन बंदींना रंगेहाथ पकडून त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांची नावे सचिन बाबासाहेब चव्हाण (३३, रा. कवठेपिरान), किरण लखन रणदिवे (२७, रा. कारंदवाडी) आणि सम्मेद संजय सावळवाडे (२४, रा. आष्टा) अशी आहेत. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली.
दि. २९ मार्च रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बॅरेक क्रमांक ३ मधील स्वच्छतागृहात हे तिघे औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमप्रमाणे तयार करून ओढत होते. त्यावेळी सुभेदार सूर्यकांत पाटील, हवालदार बबन पवार आणि शिपाई हणमंत पाटणकर बॅरेकची पाहणी करत असताना बाथरूममध्ये गांजा ओढताना तिघे आढळले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
तपासात सचिन चव्हाण याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाचा वापर करून बनवलेली चिलिम आणि अर्धवट जळालेला गांजा सापडला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


