
नागपूर प्रतिनिधी
उमरखेड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण
घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बसचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे .
पीडित विद्यार्थीनीला नागपूर येथे नेऊन हा अत्याचार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी बसचालकाला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. संदीप विठ्ठल कदम (40, उमरखेड) असे बसचालकाचे नाव आहे. हे प्रकरण उजेडात येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र पुन्हा एकदा राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
माहितीनुसार, संदीप विठ्ठल कदम (40, उमरखेड) हा बसचालक असून तो नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत आहे. बसचालक हा पीडितेला नेहमीच भेटत असे. अशातच 23 मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास नागपूर येथे पोहोचल्यानंतर तो पीडितेला एका रूमवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुपारी चार वाजता नागपूर ते सोलापूर बसने पीडितेला उमरखेड येथे घेऊन निघाला. या दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर उमरखेड येथे आल्यावर पीडितेने घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आईसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चालकावर गुन्हे नोंद करून अटक केली. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.