
ठाणे प्रतिनिधी
ठाणे: गस्तीवर असताना झालेल्या अपघातात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन खटे (४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सचिन खटे हे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते कांदीवली येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होते. १८ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते संकल्प चौक परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा तोल जाऊन ते पदपथावर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाही सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सचिन खटे यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. ते मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष असल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.