
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील आरे-कफ परेड मेट्रो लाईन-३ च्या
बांधकामासाठी पूर्वी बंद केलेले प्रमुख रस्ते २४ मार्चपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी ही घोषणा केली असून, सोमवारपासून हे रस्ते वाहनांच्या नियमित वाहतुकीसाठी पूर्णपणे उपलब्ध असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबतची माहिती दक्षिण वाहतूक विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी दिली आहे.
कोणते रस्ते होणार सुरु?
डीएन रोड- यापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते हुतात्मा चौकाकडे जाणारी दक्षिणेकडील वाहतूक बंद होती आणि उत्तरेकडे जाणारी वाहतूक देखील मर्यादित होती. आता, हुतात्मा चौक ते सीएसएमटी पर्यंत दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील दोन्ही लेन नियमित वाहतुकीसाठी खुल्या असतील.
महर्षी दादीची मार्ग- यापूर्वी, फिरोजशाह मेहता मार्गावरून एमजी रोडसाठी महर्षी दादीची मार्गाकडे जाण्यास वाहनांना बंदी घालण्यात आली होती. आता, हा रस्ता डीएन रोडच्या जंक्शनपासून एमजी रोड (चाफेकर बंधू चौक) कडे जाणारा एकेरी मार्ग म्हणून काम करेल.
एके नायक मार्ग- पूर्वी, चरणजित राय मार्गाकडे जाणारा हा दुतर्फा रस्ता होता. आता, ते महर्षी दादीची मार्गाच्या जंक्शनपासून चरणजित राय मार्गाकडे जाण्यासाठी एकेरी रस्ता म्हणून काम करेल.
पुरुषोत्तमदास ठाकूरदास मार्ग- पूर्वी ए.के. नायक मार्गाकडे जाणारा एकेरी मार्ग करण्यात आला होता. आता ए. के. नायक मार्गावरून डीएन रोड (उत्तरेकडे) जाणाऱ्या नियमित वाहतुकीसाठी हा एकेरी रस्ता म्हणून काम करेल.
महात्मा गांधी मार्ग- सुरुवातीला चाफेकर बंधू चौक ते हुतात्मा चौक आणि उलट अशा दुतर्फा रस्त्यात रूपांतरित केले होते. २४ मार्चपासून सीटीओ जंक्शनवरून जाणारी वाहतूक चाफेकर बंधू चौकात उजवीकडे वळेल, हुतात्मा जंक्शनकडे जाण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब करेल आणि नंतर डीएन रोड (उत्तरेकडे) सीएसएमटी जंक्शनकडे डावीकडे जाईल.
काही ठिकाणी लावले निर्बंध
हे रस्ते पुन्हासुरु झाल्यावर दक्षिण मुंबईतील गर्दी कमी होईल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे सीएसएमटी, हुतात्मा चौक, एमजी रोड आणि इतर प्रमुख ठिकाणांकडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल, असे वाहतूक उपायुक्त कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सततची वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज रोडच्या दोन्ही बाजूंना तात्पुरती नो-पार्किंग बंदी जाहीर केली आहे. रविवारपासून लागू होणारा हा निर्बंध २२ जूनपर्यंत लागू राहील. वाहतूक सुरळीत करणे आणि पादचाऱ्यांची, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
कोठे असेल पार्कींग बंदी?
पेरी क्रॉस रोड ते ए-वन बेकरी जंक्शनपर्यंत पसरलेल्या १५ मीटर रुंदीच्या एकेरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग करणे अवघड आहे. त्यामुळे पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी या रस्त्यावर पार्किंग बंदी केली आहे. तसेच सेंट अँड्र्यूज रोडवर वाहनांच्या पार्किंगवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. आदेशानुसार, अंमलबजावणी कालावधीत २४ तास नियुक्त केलेल्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास सक्त मनाई असेल. नियमांचे पालन होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.