
मुंबई प्रतिनिधी
होळीच्या दिवशी आदर्श लेनमध्ये चालणाऱ्या अनधिकृत गारमेंट्समध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने स्थानिक ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सदर कामगारास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, निर्मल नगर हद्दीत चालणाऱ्या अनधिकृत गारमेंट्स आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची ओळख निश्चित करणे आवश्यक असल्याचे भाजप वांद्रे पूर्व विधानसभा शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यामध्ये कुणी बांगलादेशी नागरिक तर नाही ना, याची तपासणी होण्याची मागणी करण्यात आली.
या विषयावर आज सायंकाळी भाजप वांद्रे पूर्व विधानसभेच्या शिष्टमंडळाने निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांची भेट घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वाघ यांनी सर्व अनधिकृत गारमेंट्स आणि त्यामध्ये राहणाऱ्या कामगारांची ओळख पटवून तपास सुरू असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच, या प्रकरणाचा लवकरच अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.