
सोलापूर प्रतिनिधी
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या (स्व.) विठाबाई नारायणगावकर यांच्या द्वितीय कन्या व ज्येष्ठ तमाशा कलावंत व फडमालक संध्या माने- सोलापूरकर (वय ७२) यांचे मंगळवारी दुपारी सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तमाशा कलावंत रोहन, सुरेश सोलापूरकर हे दोन पुत्र व एक विवाहित कन्या असा परिवार आहे.
प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगल बनसोडे, मालती इनामदार, भारती सोनवणे या त्यांच्या भगिनी असून, फड मालक कैलास, विजय व राजू नारायणगावकर त्यांचे बंधू आहेत. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील समई व थाळी नृत्य करणारी, नृत्यावर जीवापाड प्रेम करणारी प्रख्यात नृत्यांगना काळाच्या पडद्याआड गेली आहे.
मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशात वयाच्या दहाव्या वर्षापासून पासून नृत्यांगना म्हणून काम करण्यास संध्या यांनी सुरवात केली. समई नृत्यांगना म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात त्या परिचित झाल्या. सोलापूरचे रहिवासी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकी वादक पती रमेश माने यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचा नवीन फड तयार केला.
पतीच्या निधनानंतरही मुले रोहन, सुरेश सोलापूरकर यांच्या मदतीने त्यांनी तमाशा फड सुरू ठेवला. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२० साली माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तमाशा सम्राज्ञी विठाबाई जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. चिकनगुनिया आजार झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याची माहिती मोहित नारायणगावकर यांनी दिली.