सोलापूर प्रतिनिधी
उन्हाचा तडाखा वाढू लागला असताना लहान मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जातात. तशी मागणी शिक्षक संघटनांनी यापूर्वीच केली आहे. पण, ४ मार्च रोजी होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होणार असून साधारणत: १० मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून त्याअंतर्गत एक लाख ९८ हजार विद्यार्थी शिकत आहेत. सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा किती, याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. मागील आठवडाभरात तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या चिमुकल्यांची शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जाणार असून तसा प्रस्ताव देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत आता लोकप्रतिनिधी नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची ४ मार्च रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील नवीन आठवड्यातील पहिल्याच सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतील, असेही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने काही माध्यमिक शाळा काही दिवसांपासूनच सकाळच्या सत्रात भरायला सुरवात झाली आहे.
विद्यार्थ्यांना ४१ दिवस उन्हाळा सुटी
२०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. त्यानंतर विद्यार्थी शाळेला येत नाहीत, पण अधिकृतपणे ३ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना, विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी असणार आहे. १५ जूनपासून २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. कदाचित २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी होईल, असेही अधिकारी सांगतात.


