
मुंबई प्रतिनिधी
परभणीतील एका युवकाच्या अवयवदानामुळे पाच जणांना नवे आयुष्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, या युवकाचे हृदय चार्टर विमानाने मुंबईत फुफ्फुस पुण्यात तर यकृत ४५० किलोमीटरचे ग्रीन कॉरिडॉर करून नागपुरात आणले.
छत्रपती संभाजीनगर येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले. दीपक विलासराव दराडे (वय २५, रा. जिंतूर, जि. परभणी) असे अवयवदात्याचे नाव आहे.
दीपक शनिवारी शेतातून चालत असताना, अचानक तोल जाऊन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाला आणि तो कोमामध्ये गेला. त्याला उपचारासाठी परभणीच्या देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मेंदू मृत झाल्याचे निदान केले. सोबतच नातेवाइकांना अवयवदानासाठी समुपदेशन केले.
वडील विलास दराडे, आई कुसुम दराडे, भाऊ राजू आणि माधव यांनी त्या दुःखातही अवयवदानाला संमती दिली. देवगिरी हॉस्पिटल प्रशासनाने पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर ‘झेडटीसीसी’ने नियमानुसार, हृदय मुंबईतील ५३ वर्षीय महिला रुग्णाला, फुफ्फुस पुण्याच्या ५० वर्षीय महिलेला, यकृत नागपूरमधील ६३ वर्षीय रुग्णाला, तर दोन मूत्रपिंडांपैकी एक छत्रपती संभाजीनगर येथील ५२ वर्षीय रुग्णाला, तर दुसरे छत्रपती संभाजीनगर येथीलच ३५ वर्षीय रुग्णाला दान देण्यात आले.
परभणी ते नागपूर ग्रीन कॉरिडॉर करून रुग्णवाहिकेतून यकृत पाच तासांत नागपुरात पोहोचले. तब्बल ४५० किलोमीटर अंतराचे पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.
नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांनी यकृत प्रत्यारोपण केले. यापूर्वी, २०२३ मध्ये एम्स (AIIMS) रायपूरमधून यकृत नागपुरात आणले होते. त्यानंतर आता परभणीतून यकृत आणले गेले.