
मुंबई प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानीचं शहर ओळख असलेल्या मुंबईचा बोलबाला आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईत रोज हजारो कोटींची उलाढाल होते. त्यामुळेच हे शहर औद्योगिक विकासासाठी ओळखलं जातं
अधिक अधिक सोयीसुविधा देण्याच्या प्रयत्नात मुंबईत बऱ्याच उंच इमारती उभारण्यात येतात. मात्र, मुंबईतील ज्या जमिनीवर अशा मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत तीच जमीन आता खचत चालल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील खारफुटी जमिनीला लागून असलेल्या सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर यासारख्या मध्यवर्ती भागांमध्ये अशा घटना समोर आल्यात.
मुंबईतील ‘या’ भागात खचतेय जमीन
मुंबई म्हटलं की समोर येते ती विविध पायाभूत सुविधांमधील वाढ आणि वेगवेगळी विकासकामे. मात्र, हीच विकासकामं मुंबईतील काही भागांमधील जमीन खचण्याला कारणाभूत ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषत: मुंबईतील काही भागांच्या आसपास खाडी असल्याने जमिनीच्या वरच्या थराखालील माती भुसभुशीत होत चालली आहे. विकासकामांमुळे वजन न पेलवल्यानं मुंबईतील काही मध्यवर्ती भाग खचत चाल्याची माहिती तिथल्या रहिवाशांकडून मिळाली आहे.
प्रतीक्षानगर भागातील इमारती
म्हाडा संस्थेकडून पत्रकार, मंत्रालय कर्मचारी, पोलीस तसेच हुत्मांच्या कुटुंबीयांसाठी इमारती बनवण्यात आल्या. मात्र, त्या इमारतीची पातळी आणि इमारतीच्या आसपासच्या परिसरातील पातळीमध्ये असंतुलन होत असल्याकारणाने तिथली जमीन ही रहिवाशांना खाली- वर असल्याची भासत आहे. यामुळे वयस्कर मंडळींना चालण्यात अडचणी येत असल्याचे सुद्धा रहिवाशांकडून सांगण्यात आले. मुंबईतील या भागात खारफुटीची जमीन असल्याने जमीन खचण्याचं प्रमाण वाढलंय, असा तिथल्या रहिवाशांचा दावा असून खाडीवरचा भराव खचतोय का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ज्या जमिनीवर इमारती उभ्या राहिल्या आहेत, त्या जमिनीचा ढाचा मजबूत नसावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. खरंतर, प्रतीक्षानगर पूर्णपणे दलदलीच्या जमिनीवर वसलंय आणि अशा जमिनीवर चांगला भराव घालून इमारत बांधणं अपेक्षित आहे. मात्र, तिथल्या रहिवाशांनी इमारतींचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.