
मुंबई प्रतिनिधी
आदिच डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमात सध्या मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू आहे. बेस्टकडे आता फक्त 500 बस शिल्लक आहेत तर खासगी जवळपास 2500 बस आहेत. हा खासगी बस कर्मचारी वर्गदेखील खासगी आहे. या खासगी कंत्राटदार कामगार वर्गाला कोणताच कामगार कायदा लागू होत नाही.
गेल्या चार वर्षांत या खासगी बसमुळे मोठ्या प्रमाणात जीवघेणे अपघात होत आहेत. बेस्टच्या चुकीच्या नियोजनामुळे बेस्टवर ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे बेस्टचे नीट नियोजन करून बेस्टचे खासगीकरण थांबवा आणि मुंबईकरांची बेस्ट वाचवा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्टचे नवनियुक्त महाव्यवस्थापक एस. श्रीनिवास यांच्याकडे केली.
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच सनदी अधिकारी एस. श्रीनिवास यांच्याकडे सोपावण्यात आला आहे. श्रीनिवास यांनी नुकतीच कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊस या बेस्टच्या मुख्यालयाला भेट दिली असता सुहास सामंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला वाचवा, अशी मागणी केली.
प्रमुख मागण्यां
* बेस्टने स्वमालकीच्या 3 हजार 337 बस घेऊन त्यावर कायमस्वरूपी, कामगार भरती करावी.
* अभियांत्रिकी विभाग परत सक्षम करून तो कार्यरत करण्यात यावा.
* विद्युत पुरवठा विभागात एमईआरसी नियमानुसार एआरआरमध्ये सर्व प्रकारची कर्मचारी भरती करा.
* बेस्टमध्ये कार्यरत असणाऱ्या युनियनची कामगार वर्गाची सभासद नोंदणी प्रक्रिया गेली तीन वर्षे बंद आहे ती पुन्हा सुरू करण्याची सूचना करावी.
बेस्ट उपक्रमातून गेल्या तीन वर्षांपासून बेस्टमधून निवृत्त झालेल्या काही अधिकारी वर्गाला गलेलठ्ठ पगार देऊन कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्याची चुकीची प्रथा बेस्टने सुरू केली आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रतीक्षा यादीवर आसलेल्या निवृत्त कामगार वर्गाच्या तरुण मुलांना नोकरी मिळत नाही.