नागपूर प्रतिनिधी
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्यावरून राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे अभयारण्यच रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अभयारण्यामुळे स्थानिकांच्या पारंपरिक हक्कांवर, रोजगारावर आणि उपजीविकेवर मर्यादा येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी पर्यावरणाच्या नावाखाली अभयारण्यासाठी आग्रह धरणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरही त्यांनी टीका केली आहे.

२०२० मध्ये अभयारण्याची घोषणा
कन्हाळगाव अभयारण्याची घोषणा २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या अभयारण्यात सुमारे ३१ हजार हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी अभयारण्याच्या निर्मितीलाच आक्षेप घेतला आहे. २०१४ ते २०१९ या काळात आपण वनमंत्री असताना स्थानिकांच्या विरोधामुळे या अभयारण्याला मान्यता दिली नव्हती, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
अभयारण्यामुळे जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पारंपरिक हक्कांवर गदा येऊ शकते. त्यांच्या रोजगाराच्या संधी आणि उपजीविकेवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे, असे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही मुंबईत बसून काही पर्यावरणवादी अभयारण्यासाठी आग्रह धरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्योगांसाठी वनक्षेत्राचा वापर केला जातो किंवा जंगलतोड होते, त्यावेळी हे पर्यावरणवादी विरोध का करत नाहीत, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पर्यावरणाच्या नावाखाली अभयारण्याचा आग्रह धरणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
ताडोबा-कावल व्याघ्र भ्रमणमार्गाचे महत्त्व
दुसरीकडे, कन्हाळगावचे जंगल वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा हा महत्त्वाचा व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या परिसरात समृद्ध जैवविविधता असून, सुमारे २२ ते ३२ वाघांचा अधिवास असल्याचे सांगितले जाते.
वाघांना सुरक्षितपणे संचार करता यावा आणि दोन महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांमधील संपर्क कायम राहावा, यासाठी या जंगलाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीमुळे वन्यजीव संवर्धनाचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
मानव-वन्यजीव संघर्षामुळे चिंता
विदर्भात वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कन्हाळगावचा वाद अधिक चर्चेत आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत भंडारा जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. आता वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांनाही लक्ष्य केले जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील कोंढी गावात सोमवारी पहाटे वाघाने तीन पाळीव जनावरांना ठार केले. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पशुधनाच्या नुकसानीचे नवे संकट उभे राहिले आहे.
मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रावर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे आता स्थानिक नागरिकांसह वन्यजीव संवर्धकांचे लक्ष लागले आहे.


