नागपूर प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कार भाजपचे विधानपरिषदेतील आमदार परिणय फुके यांच्या मालकीची असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर अपघाताच्या वेळी आमदार फुके यांचा मुलगा यथार्थ फुके हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार परिणय फुके यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट करत प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अपघातग्रस्त वाहनात माझा मुलगा नव्हता. तो दुसऱ्या गाडीत होता. मृत्यू झालेला तरुणही माझ्या मुलासारखाच होता,’ असे भावनिक स्पष्टीकरण देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस आणि विरोधकांचे आरोप दुर्दैवी आणि आक्षेपार्ह
पेंच अभयारण्य परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष नेत्यांकडून माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल करण्यात आलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहेत.
अपघातग्रस्त वाहनात माझा…
— Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) November 12, 2026
‘मुलगा अपघातग्रस्त गाडीत नव्हताच’; फुकेंचा दावा
परिणय फुके यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, पेंच अभयारण्य परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून माझ्याबद्दल तसेच माझ्या कुटुंबाबद्दल करण्यात आलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहेत. अपघातग्रस्त वाहनात माझा मुलगा नव्हता. तो दुसऱ्या वाहनात होता. या अपघातात ज्या तरुणाचा मृत्यू झाला, तोदेखील माझ्या मुलासारखाच होता. त्याच्या कुटुंबीयांशी आमचे स्नेहाचे संबंध आहेत. या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आमचे कुटुंबही प्रचंड दुःखात असून आम्ही अद्याप या धक्क्यातून सावरलेलो नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अपघात नेमका कसा घडला, त्यावेळी वाहन कोण चालवत होते आणि घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती होती, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासातून कोणतीही ठोस वस्तुस्थिती समोर येण्यापूर्वीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आरोप करणे चुकीचे आहे. या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फुके यांनी केला आहे.
‘राजकीय स्वार्थासाठी मृत्यूच्या घटनेचा वापर नको’
या दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी टाळायला हवा होता, अशी भूमिका फुके यांनी मांडली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य आणि न्याय महत्त्वाचा आहे. माझा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला किंवा अपप्रचाराला बळी न पडता पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी. तपासातून सत्य समोर येईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नेमका काय आहे पेंच अपघाताचा घटनाक्रम?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेंच अभयारण्य परिसरात नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या वाहनात तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. या दुर्घटनेत झिदान अली या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या अपघातातील वाहनाचा क्रमांक MH40AH7227 असल्याचा उल्लेख विविध वृत्तांत करण्यात आला आहे. हे वाहन आमदार परिणय फुके यांच्या मालकीचे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. अपघातानंतर या वाहनात आमदार फुके यांचा मुलगा यथार्थ फुके होता आणि तोच गाडी चालवत होता, असा आरोप सोशल मीडियावरून करण्यात आला. वाहनातील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप करण्यात आला. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत तपासातून दुजोरा मिळालेला नाही.
हर्षवर्धन सपकाळ आणि सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून भाजपला लक्ष्य केले आहे. आमदार परिणय फुके यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. एका तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे हे प्रकरण राजकीय दबावातून दडपण्याचा किंवा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये. आमदाराचा मुलगा असला तरी कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करत या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरण असल्याने तपासावर दबाव येणार नाही ना, अशी शंका उपस्थित करत त्यांनी निष्पक्ष चौकशीचा आग्रह धरला आहे.
दोन गाड्या होत्या की एक? तपासातून काय समोर येणार?
या संपूर्ण प्रकरणात आता दोन वेगवेगळे दावे समोर आले आहेत. विरोधकांच्या आरोपानुसार यथार्थ फुके अपघातग्रस्त वाहन चालवत होते. मात्र, परिणय फुके यांनी हा दावा फेटाळत आपला मुलगा दुसऱ्या वाहनात असल्याचे स्पष्ट केले आहे. फुके यांच्या निकटवर्तीयांकडूनही दोन वाहने प्रवास करत होती आणि दोन्ही वाहनांवर व्यावसायिक चालक होते, असा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे अपघाताच्या वेळी प्रत्यक्षात किती वाहने होती, अपघातग्रस्त वाहन कोण चालवत होते, चालकाने मद्यप्राशन केले होते का आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. मध्य प्रदेशातील कुरई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
एका तरुणाचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाल्याने या घटनेचे गांभीर्य मोठे आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन मृत तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आणि अपघातामागील सत्य निष्पक्ष तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. परिणय फुके यांच्या खुलाशानंतर आता विरोधक काय भूमिका घेतात आणि पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


