सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता या विद्यालयांना स्थानिक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर आणि महापुरुषांची नावे दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव होणार आहे.




राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. यापूर्वी कोकण आणि नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यासंदर्भात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर या दोन विभागांव्यतिरिक्त राज्यातील अन्य विभागांमधील उर्वरित ५१ विद्यालयांच्या नामांतराचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. आता या प्रस्तावाला निर्णयाचे स्वरूप मिळाले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या नामांतर प्रक्रियेसाठी कौशल्य विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यालयांची नावे निश्चित करून बदलण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.
या निर्णयात प्रत्येक विद्यालयाला त्या परिसराशी संबंधित ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाला हिरोजी इंदुलकर यांचे नाव देण्यात येणार आहे. तर साताऱ्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी रंगो बापूजी गुप्ते यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या नामांतरामागील प्रमुख उद्देश आहे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी ओळख मिळणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या योगदानाची आठवण शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कायम राहण्यास मदत होणार आहे.


