अहिल्यानगर,प्रतिनिधी
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात विखे-थोरात गटाचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सहकार पॅनेलच्या माध्यमातून सुजय विखे-पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. तर रणजित देशमुख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणात एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले.
या दोन्ही नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सहकार पॅनेलची स्थापना केली होती. याच पॅनेलकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना अध्यक्षपद मिळाले, तर बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख उपाध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात दोन्ही नेत्यांच्या एकत्रित राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेल आणि खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट लढत झाली होती.
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी सहकार पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल असा संघर्ष पाहायला मिळाला. या लढतीत सहकार पॅनेलच्या माध्यमातून विखे-पाटील आणि थोरात यांनी एकत्रित राजकीय ताकद दाखवली. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीही बिनविरोध झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नव्या नेतृत्वाची सूत्रे सुजय विखे-पाटील आणि रणजित देशमुख यांच्या हाती आली आहेत.


