मुंबई प्रतिनिधी
मुंबई/छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्यांदाच थेट आणि तीव्र टीका केली आहे. शिंदे “डबल गेम” करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने अनेक नेत्यांसाठी मोठे योगदान दिले, मात्र आता त्याच समाजावर अन्याय केला जात आहे. भुमरे यांच्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी जीवाचे रान केले होते. त्याची परतफेड अशी केली जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “सध्या तात्पुरते प्रमाणपत्र द्या आणि नंतर रद्द करा, असे सांगण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांची यावर प्रतिक्रिया नसल्याने त्यांची मुकसंमती असल्याचे दिसते,” असा आरोप त्यांनी केला. तसेच संजय सिरसाठ यांच्या भूमिकेमागेही एकनाथ शिंदे यांचाच कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
जरांगे पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आणू नका. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला होता. मात्र आता आमच्याच समाजातील मुलांचे नुकसान केले जात आहे.” यावेळी त्यांनी शिंदे यांना इशाराही दिला.
“मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? मी कुणालाही घाबरत नाही, गरज पडली तर तुरुंगात जाण्यासही तयार आहे,” असे ते म्हणाले. तसेच बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली.
मंत्रालयातून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे काम होत असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. तसेच शिंदे त्यांच्या नेत्यांच्या बैठका घेत असल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी कधीही इतक्या तीव्र शब्दांत टीका केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर एकनाथ शिंदे किंवा राज्य सरकारकडून तत्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

