मुंबई प्रतिनिधी
मिरा-भाईंदर : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केला. तरुणीने या कृत्याला विरोध करताच आरोपीने तिला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना नायगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली. या भीषण घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून तुटला असून ती गंभीर जखमी झाली आहे.
मुंबई लोकलमध्ये वादविवाद, हाणामारी, महिलांची छेडछाड आणि अश्लील कृत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच मिरा-भाईंदर परिसरात घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी मालाड येथून विरार लोकलने प्रवास करत होती. भाईंदर ते नायगाव या प्रवासादरम्यान एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले. आरोपीने तरुणीला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याने तिने त्याला विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
तरुणीने विरोध केल्याचा राग मनात धरून आरोपीने तिला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलल्याचा आरोप आहे. त्यामुळे तरुणी दोन डब्यांच्या मधून थेट रेल्वे रुळांवर पडली. यावेळी लोकलखाली आल्याने तिचा डावा हात कोपरापासून तुटला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात योग्य ती कलमे लावण्यात आली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कायदेशीर कलमे लावण्यात यावीत, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.
या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला. त्यानंतर मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन पोपळे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांसह वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. गुन्ह्यात योग्य ती कलमे वाढवून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला रेल्वे पोलिसांनी होकार दिल्याची माहिती आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


