मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पायाला प्लास्टर असलेल्या वृद्ध रुग्णाला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरअभावी जिन्याच्या पायऱ्यांवरून अक्षरशः घसरत खाली उतरावे लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संतापजनक प्रकाराची महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून पदावरून बाजूला करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
🚨 केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद !
रुग्णांचे हाल सुरूच, रुग्णालय प्रशासन मात्र झोपेत आहे का?
मुंबईतील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या केईएम रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याचे वृत्त अत्यंत संतापजनक आहे!
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग… pic.twitter.com/CW67HKH6Ce
— Amey Ghole (@AmeyGhole) November 11, 2026
केईएम रुग्णालयातील सेठ धुरमल बजाज अस्थिव्यंग केंद्रातील हा प्रकार रुग्णालयाच्या सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पायाला प्लास्टर असलेला एक वृद्ध रुग्ण जिन्याच्या पायऱ्यांवर बसून एकेक पायरी घसरत खाली उतरताना दिसत आहे. रुग्णाच्या मदतीसाठी ना व्हीलचेअर उपलब्ध आहे, ना स्ट्रेचर आणि ना रुग्णालयातील कर्मचारी. आजूबाजूने लोकांची ये-जा सुरू असतानाही रुग्णाला स्वतःच हा जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचा पाय पुन्हा दुखावण्याची, फ्रॅक्चर गंभीर होण्याची किंवा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करताना आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रुग्णाला अशा प्रकारे जिन्यावरून उतरावे लागते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण आपल्याकडे असून, रुग्णांना अशा हालअपेष्टा सहन कराव्या लागत असतील तर रुग्णालय प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई महापालिका आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटी रुपये खर्च करते. मात्र, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना साधी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लिफ्टची देखभाल वेळेवर का करण्यात आली नाही? लिफ्ट बंद पडली होती, तर ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत? संबंधित प्रस्ताव कोणी रोखून धरले होते का? लिफ्टचे काम करू नये, असे कोणाचे निर्देश होते का? असे प्रश्न उपस्थित करत भांदिर्गे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले.
विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एका लिफ्टपुरता मर्यादित नसून महापालिकेच्या रुग्णालयांमधील यंत्रणांच्या निष्काळजीपणाचे व्यापक चित्र समोर आणणारा आहे. एमआरआय, सिटी स्कॅन तसेच लिफ्टसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आधीच शारीरिक आणि मानसिक त्रासातून जात असतात. अशा वेळी त्यांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत असून, त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांची प्रतिमाही मलिन होत असल्याचे भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात कोणाला विनाकारण दोष देण्याचा हेतू नसला, तरी यांत्रिक व विद्युत विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्या पदावरून बाजूला करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
कोट्यवधींचा खर्च, पण रुग्णांच्या नशिबी पायऱ्या!
मुंबईसारख्या महानगरातील नामांकित रुग्णालयात दिव्यांग आणि वृद्ध रुग्णांना लिफ्ट, व्हीलचेअर आणि स्ट्रेचरसारख्या मूलभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत असेल, तर आरोग्य व्यवस्थेच्या दाव्यांचा उपयोग काय? केईएममधील या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


