मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. १३.९९ लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या निविदेसाठी १२ नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत असून, १३ नोव्हेंबरला निविदा उघडण्यात येणार आहे.
मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या रोपवेचे आश्वासन दिले होते. आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाला प्रशासकीय गती मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, हा रोपवे मुलुंड ते बोरिवली असा नसून केवळ मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून तारामती माता मंदिरापर्यंतच मर्यादित असेल, असे कोटेचा यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पांतर्गत डोंगरमाथ्यावर निरीक्षण मनोरा (ऑब्झर्व्हेटरी) उभारण्याचाही प्रस्ताव आहे. येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुळशी तलावाचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. रोपवेमुळे भाविकांना तारामती माता मंदिरात जाणेही सोयीचे होणार आहे.
नियुक्त करण्यात येणाऱ्या सल्लागाराला रोपवेचा योग्य मार्ग निश्चित करणे, जमिनीचे क्षेत्रफळ मोजणे, भूपृष्ठीय व भू-तांत्रिक सर्वेक्षण करणे, प्रारंभिक आणि अंतिम स्थानकांची ठिकाणे ठरवणे, आंतरराष्ट्रीय रोपवे प्रकल्पांचा अभ्यास करणे आणि संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च तयार करणे अशी कामे करावी लागणार आहेत.
मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संरक्षित वनक्षेत्र असल्याने या प्रकल्पासमोर पर्यावरणीय परवानग्यांचे मोठे आव्हान आहे. वनक्षेत्र, वन्यजीवांचा अधिवास आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचाही सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या संबंधित वन व पर्यावरण विभागांच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटनाला नवे आकर्षण देणाऱ्या या रोपवेसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


