मुंबई प्रतिनिधी
राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे. दिवसाचे तापमान सध्या स्थिर असले, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा वाढण्याची शक्यता आहे.
हवामानाबाबत नवीन अंदाज वर्तवला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पुढील चार ते पाच दिवसांत राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील ४ दिवस हवामान कसे राहणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः निरभ्र राहणार आहे. या काळात पावसाची शक्यता नसून, आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा चांगला सूर्यप्रकाश अनुभवायला मिळेल. तसेच, हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याने वातावरण प्रामुख्याने कोरडे राहील.
दिवसाचे तापमान स्थिर, रात्री गारवा वाढणार
राज्यात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, दिवसा तापमानाची स्थिती जवळपास कायम राहणार आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा अनुभव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा
पावसाचा अंदाज नसल्याने राज्यातील शेतीची विविध कामे सुरळीत पार पाडण्यास मदत होणार आहे. काढणी, मळणी तसेच इतर शेतीकामांसाठी कोरडे हवामान अनुकूल ठरू शकते. दरम्यान, रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. एकंदरीत, राज्यात आगामी काही दिवस दिवसा स्थिर तापमान आणि रात्री वाढणारा गारवा असे वातावरण पाहायला मिळणार आहे.


