मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे २०१० पासून शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, शांतता क्षेत्राचा दर्जा असतानाही दिवाळीसह विविध सणांच्या काळात या मैदानात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. फटाक्यांच्या धुरामुळे होणारे वायुप्रदूषण आणि कर्णकर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शिवाजी पार्क पोलिसांनी मैदानात बंदोबस्त तैनात करून फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित असतानाही दिवाळी, नववर्ष आणि छठपूजेसारख्या सणांच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वसुबारसच्या दिवशी रात्री पावणेबारापर्यंत मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना धूर आणि मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे स्थानिकांनी थेट शिवाजी पार्क पोलीस ठाण्याला पत्र पाठवून मैदानातील फटाकेबाजी रोखण्याची मागणी केली होती. शांतता क्षेत्रात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
सार्वजनिक ठिकाणी तसेच शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. असे स्पष्ट आदेश असतानाही शिवाजी पार्कमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरू राहणे हा गंभीर प्रकार असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले होते.
एकीकडे मुंबई महापालिकेकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या मैदानातच मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. या प्रकाराकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला होता. नियमांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेत पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त ठेवत फटाकेबाजी रोखण्यासाठी कारवाई केली आहे. त्यामुळे शांतता क्षेत्रातील फटाक्यांच्या आतषबाजीला आता लगाम बसला आहे.


