मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) अधिकारी पदस्थापनेच्या प्रक्रियेवरून प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विभाग नियंत्रक पदाच्या सुमारे आठ जागा रिक्त असताना याच पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची नियोजन व पणन विभागातील ‘नियोजन अधिकारी’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या विविध विभागांमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे वेळेत भरण्याची मागणी होत असताना नियुक्ती प्रक्रियेत प्रशासकीय निकषांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. नियोजन व पणन विभागातील ‘नियोजन अधिकारी’ हे पद गेल्या सात वर्षांपासून रिक्त होते. अशा परिस्थितीत विभाग नियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी दलित महासंघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या प्रशासकीय निकषांच्या आधारे करण्यात आली, तसेच विभाग नियंत्रक पदाच्या सुमारे आठ जागा रिक्त असताना ही नियुक्ती करणे योग्य होते का, असे प्रश्न संघटनेने तक्रार अर्जातून उपस्थित केले आहेत.
दलित महासंघाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या रिक्त पदांची स्थिती आणि नियुक्ती प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


