कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवारी झालेल्या मतदानात ९९.९६ टक्के मतदानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतपत्रिकांचे वर्गीकरण सुरू असतानाच सर्वसाधारण गटासह पाच गटांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयाच्या गणितावर परिणाम झाला आहे का आणि सतेज पाटील यांच्या आघाडीने पडद्यामागून मतांची जुळवाजुळव केली का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, क्रॉस व्होटिंगबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने अंतिम निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
शपथा, भंडारा आणि आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली!
गोकुळची निवडणूक केवळ दूध संघाच्या सत्तेसाठी न राहता महायुती विरुद्ध सतेज पाटील अशी प्रतिष्ठेची लढाई बनली होती. जागावाटपापासून प्रचारापर्यंत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. यल्लमा देवीच्या परडीतील भंडाऱ्यावरून मतदारांना आणाभाका घालण्याचा मुद्दाही चांगलाच गाजला.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी बाळूमामाच्या शपथेचा संदर्भ देताना शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावर सतेज पाटील यांनी आक्षेप घेत, पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात मतदारांना अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न योग्य नसल्याची भूमिका मांडली.
मुश्रीफांचा पलटवार; सतेज पाटलांचा सवाल
मंत्री हसन मुश्रीफ यांनी शपथांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, याला शपथ नव्हे तर आणाभाका म्हणावे, असे सांगितले. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालीही शपथा घेतल्या गेल्या होत्या, असा दावा त्यांनी केला. त्यावर सतेज पाटील यांनी, मागील निवडणुकीत शपथा घेतल्या होत्या, तर संबंधित नेते पाच वर्षे आपल्यासोबत का राहिले नाहीत, असा सवाल उपस्थित केला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीतील वातावरण अधिक तापले. आता या राजकीय संघर्षाचा मतदारांनी नेमका काय फैसला केला, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
निकालातून स्पष्ट होणार राजकीय गणित!
९९.९६ टक्के मतदानामुळे गोकुळच्या निवडणुकीत मतदारांचा मोठा सहभाग दिसून आला. आता क्रॉस व्होटिंगची चर्चा प्रत्यक्ष निकालात प्रतिबिंबित होते का, कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात आणि गोकुळच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुती आपले वर्चस्व कायम राखणार की सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीमुळे सत्तेची समीकरणे बदलणार? या प्रश्नाचे उत्तर अधिकृत निकालातूनच मिळणार असून, गोकुळच्या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


