मुंबई प्रतिनिधी
मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसही मुंबईकरांची पावसापासून सुटका झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी अचानक आलेल्या रिमझिम पावसाने काहीसा दिलासा दिला. दादर, माटुंगा, शिवाजी पार्क, कांदिवली आणि मालाड परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, राज्यातील हवामानातही बदल झाला असून, ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत शुक्रवारी सकाळी वातावरणात अचानक बदल झाला. दादरमधील शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्थानक, शिवसेना भवन परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. माटुंगा परिसरातही काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाडमध्येही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, पावसाचा जोर ओसरताच पुन्हा उकाड्याने डोके वर काढले.
चक्रीवादळाचा थेट परिणाम नाही; तरी वातावरणात बदल!
अरबी समुद्रातील ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी त्याच्या प्रभावामुळे हवामानात काही बदल होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांतून पाऊस गायब झाला होता. मात्र, गेल्या एक-दोन दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली.
३० आणि ३१ ऑक्टोबरला पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी तळ कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाटमाथ्याच्या परिसरात ३० ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दुष्काळाच्या सावटात पावसाची हजेरी!
एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे संकट गडद झाले असताना, दुसरीकडे ऑक्टोबरच्या अखेरीस काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाच्या सरींचे महत्त्व वाढले आहे. मात्र, हा पाऊस शेतीला कितपत दिलासा देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


