पुणे प्रतिनिधी
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या कोट्यापासून त्या अवघ्या ७३६ मतांनी दूर असल्याने त्यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हर्षदा देशमुख यांना आतापर्यंत १ लाख १२ हजार ३७७ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाल्याची माहिती आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत. वैध मतांच्या ५० टक्के अधिक एक मत या निकषानुसार विजयाचा कोटा ठरवण्यात आला आहे.
या निवडणुकीत तब्बल १७ हजार २९९ मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. पसंतीक्रम नोंदवताना झालेल्या चुका आणि मतदानाच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतपत्रिका बाद झाल्याचे समोर आले आहे. अवैध मते वगळूनच विजयासाठी आवश्यक कोटा निश्चित करण्यात आला.
हर्षदा देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवल्याने त्यांच्या विजयाची शक्यता बळावली आहे. उर्वरित मतमोजणीतून आवश्यक कोटा पूर्ण झाल्यास महाराष्ट्र विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संख्याबळ एका आमदाराने वाढणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


