पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मतमोजणीच्या प्रक्रियेमुळे अंतिम निकालासाठी मध्यरात्र उलटण्याची शक्यता आहे. मतपत्रिकांची मोठी संख्या, विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा आणि पहिल्या पसंतीत विजय निश्चित न झाल्यास करावी लागणारी पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी, ही निकालाला विलंब होण्यामागील तीन प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे प्राथमिक कल लवकर स्पष्ट झाले, तरी अधिकृत निकालासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी तथा ‘महाऊर्जा’चे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना, तर सहआयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.
तीन कारणांमुळे निकालाला विलंब
१. मतपत्रिकांची प्रचंड संख्या
पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ५२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक मतदारसंघात ६१ हजार ९४० मतदारांपैकी ५३ हजार १८४ मतदारांनी मतदान केले. या दोन्ही मतदारसंघांतील अनुक्रमे ७४१ आणि ३१० मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांची मोजणी करावी लागणार आहे. मतपत्रिकांची संख्या मोठी असल्याने त्यांचे वर्गीकरण आणि मोजणीसाठी वेळ लागणार आहे.
२. विजयाचा कोटा ठरविण्याची प्रक्रिया
मतमोजणीच्या सुरुवातीला सर्व मतपत्रिकांचे वर्गीकरण करून वैध आणि अवैध मतांची छाननी केली जाईल. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करून विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित केला जाईल. कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीत हा कोटा पूर्ण करता आला नाही, तर पुढील पसंतीच्या मतांच्या आधारे निवडणुकीचा निकाल निश्चित करावा लागेल. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरणार आहे.
३. पसंतीक्रमाच्या मतांची फेरमोजणी
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत पसंतीक्रमानुसार मतदान केले जाते. पहिल्या पसंतीत विजय निश्चित न झाल्यास सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात वर्ग केली जातात. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहू शकते. पदवीधर मतदारसंघात उमेदवारांची संख्या अधिक असल्याने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी १०० टेबल; शिक्षकसाठी ४२ टेबल
मतमोजणी जलद आणि व्यवस्थित पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी पाच स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून, प्रत्येक कक्षात दहा टेबलांच्या दोन रांगा असतील. अशा प्रकारे एकूण १०० टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी सहा कक्षांमध्ये प्रत्येकी सात टेबलांच्या दोन रांगा लावण्यात आल्या असून, एकूण ४२ टेबलांवर मतमोजणी पार पडेल.
प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन सहायक आणि एक शिपाई नियुक्त करण्यात येणार आहे. मतपेट्या उघडणे, ५०-५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करणे आणि प्रत्येक फेरीची नोंद ठेवणे, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शिक्षक मतदारसंघाचा कल आधी; पदवीधरचा निकाल रात्री उशिरा?
मतमोजणीची प्रक्रिया आणि मतपत्रिकांची संख्या लक्षात घेता शिक्षक मतदारसंघातील प्राथमिक कल दुपारनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी सायंकाळपर्यंत सुरू राहू शकते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा मिळाला नाही, तर पसंतीक्रमानुसार पुढील फेऱ्या घ्याव्या लागतील.
त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांवरून उमेदवारांच्या विजयाचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले, तरी अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. विशेषतः पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत किंवा त्यापुढेही सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, मतपत्रिकांची संख्या, विजयाचा कोटा आणि पसंतीक्रमाच्या मतांची प्रक्रिया या तीन बाबींवरच निकालाचा वेग अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रांवरील प्रत्येक फेरीकडे उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


