पुणे प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव करत गावडे यांनी २३ हजार २०० मते मिळवली. तर सचिन सानप यांना १७ हजार मते मिळाली. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच कौस्तुभ गावडे आघाडीवर होते. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निकालामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
कौस्तुभ गावडे यांना २३,२०० मते
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे, सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीदरम्यान कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर, सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर, तर दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर होते. अखेर गावडे यांनी २३ हजार २०० मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. सानप यांना १७ हजार मते मिळाली.
विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या समर्थकांनी एकत्र येत जल्लोष केला. या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी दिलेला कौल आणि त्यामागील राजकीय समीकरणे यांची चर्चा आता सुरू झाली आहे.
विवेकानंद शिक्षण संस्थेबाहेर जल्लोष
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात समर्थकांनी जल्लोष केला. गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
“विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहू,” अशी भूमिका मयुरी गावडे यांनी मांडली. कौस्तुभ गावडे यांना राज्यातील कमी वयाच्या आमदारांपैकी एक म्हणून बहुमान मिळणार असल्याची चर्चाही या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे.
पराभवानंतर सचिन सानप यांची प्रतिक्रिया
दरम्यान, पराभव स्वीकारताना सचिन सानप यांनी कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन केले. मात्र, निवडणुकीतील लढतीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्य लढत कौस्तुभ गावडे आणि आपल्यामध्येच होती, त्यामुळे मतविभाजनाचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत पैसे वाटल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सानप यांनी शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. तसेच, “एक खंत मनात आहे की शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडला नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पराभव झाला असला, तरी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम सुरूच ठेवणार असल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर अपेक्षा वाढल्या
कौस्तुभ गावडे यांच्या विजयामुळे शिक्षकांच्या प्रश्नांवर आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी विधानमंडळात किती प्रभावीपणे आवाज उठवला जातो, यावर त्यांच्या पुढील कार्याची दिशा ठरणार आहे.
एकीकडे विजयाचा जल्लोष, तर दुसरीकडे पराभवानंतर व्यक्त झालेली खंत, अशा वातावरणात पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.


