मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान सुरू असून, याचदरम्यान पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील कथित पैसेवाटपावरून राजकीय आरोप समोर आले आहेत. भाजपाकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमधून केला आहे.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे…
— Supriya Sule (@supriya_sule) October 23, 2026
मतदारांच्या खिशाला स्पायकॅम असलेले पेन लावून भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मतदानानंतर हा व्हिडिओ दाखवल्यावर ठरलेले पैसे दिले जात असल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी मतदान होत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या पदवीधर मतदारसंघांसह पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत.
सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणार असून, मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.


