मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक रस्त्यांवर वारंवार कचरा टाकणाऱ्या झोपडीधारकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (SRA) दिले आहेत. दोनपेक्षा अधिक वेळा गुन्हा दाखल झाल्यास किंवा दंड भरावा लागल्यास संबंधितांचा कायमस्वरूपी पर्यायी निवासाचा हक्क जप्त करण्यासारख्या उपायांचा विचार करण्याचे न्यायालयाने सुचवले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने विविध याचिकांवरील सुनावणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदवली. यात कन्नमवार नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी असोसिएशन लिमिटेडच्या याचिकेचाही समावेश होता. कांजूरमार्ग येथील कचरा भरावभूमीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी, विषारी वायू आणि आरोग्याच्या धोक्यांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा याचिकांमधून मांडण्यात आला.
सरकारी जमीन किंवा खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करून पर्यायी निवास मिळाला, म्हणून सार्वजनिक रस्त्यांवर कचरा टाकण्याची मुभा मिळत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. झोपडीधारकांच्या बेशिस्त वर्तनामुळे इतर नागरिकांच्या स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याच्या संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होता कामा नये, असेही खंडपीठाने बजावले.
मुंबई महानगरपालिकेचे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी अंधेरीतील के-पश्चिम विभागात कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रतिज्ञापत्रांद्वारे दिली. मुंबईच्या लोकसंख्येपैकी ४२ टक्क्यांहून अधिक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. या भागांत स्वच्छता मोहीम राबवताना पथकांना स्थानिकांचा विरोध आणि सुरक्षाविषयक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या संपर्कात असलेल्या नगरसेवकांची मदत घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले. तसेच, कचरा व्यवस्थापनाच्या कामात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग कसा घेतला जात आहे, याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.
कचऱ्याबाबत वारंवार कारवाई करूनही आर्थिक दंडाचा परिणाम होत नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कठोर परिणामांची तरतूद केल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कंत्राटदाराच्या वतीने उपस्थित वकील संकेत मोने यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच मध्यरात्री केलेल्या पाहणीचाही संदर्भ दिला.


