मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या महापौर रितू तावडे असतील. या पुलांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत होण्यासह प्रवासाचा वेळ वाचण्याची अपेक्षा आहे.
🔷शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव – मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी आज होणार खुले#mybmcupdates@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu… pic.twitter.com/lw0Gtj7IRT
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 22, 2026
शीव रेल्वे स्थानकाजवळील तब्बल ११२ वर्षे जुन्या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे होते. उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या, वृक्ष आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्थलांतरासारख्या अडचणी असूनही हा पूल नियोजित वेळेपेक्षा चार महिने आधी पूर्ण झाला. हे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या पुलामुळे धारावी, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल आणि कुर्ला परिसराचा पूर्व द्रुतगती महामार्गाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकावरील नवीन उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सुमारे २० मिनिटांची बचत होण्यासह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील विद्यमान पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ सुमारे १.२६ किलोमीटर लांबीचा तीन बाय तीन मार्गिकांचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्गापासून दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत हा पूल आहे. या प्रकल्पात जुळ्या बोगद्यांचाही समावेश असून, गोरेगाव, दिंडोशी, मुलुंड आणि आसपासच्या भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने या तीनही पुलांची कामे पूर्ण केली आहेत. लोकार्पणानंतर हे पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर मुंबईकरांचा प्रवास किती वेगवान होतो आणि वाहतूक कोंडीला कितपत दिलासा मिळतो, हे स्पष्ट होईल.


