मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील दोन ते पाच महिन्यांत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. “एक छोटा काळ असा येईल, जिथे देशाला पंतप्रधानच नसेल,” असे सूचक विधान त्यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताबदलाबाबत केलेल्या विधानानंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरही भाष्य करत मतदान बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी पुन्हा केली. २०१८ पासून आपण ही भूमिका मांडत असून, यासाठी निवडणूक आयुक्तांशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मतदानानंतर मतदाराला आपले मत योग्य प्रकारे नोंदवले गेल्याचे समाधान मिळणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मतमोजणीला चार दिवस लागले तरी चालतील, मात्र निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम राहायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. फ्रान्समध्येही यंत्रपद्धतीऐवजी पुन्हा बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला.
संजय राऊत यांच्याशी आपले बोलणे झाल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आगामी दोन ते पाच महिन्यांत काहीतरी मोठे घडू शकते, असे म्हटले. अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित छायाचित्रे आणि माहितीचा उल्लेख करत आगामी काळात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून चुका होत राहिल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली, तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या काही वर्षांत जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
नीट परीक्षेशी संबंधित आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थी केवळ एका मुद्द्यासाठी नव्हे, तर मनात साचलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार का करण्यात आला आणि आंदोलनात अराजकता कुठे होती, असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीका केली.
दुष्काळ, संभाव्य अन्नधान्य टंचाई आणि अन्य संकटांमुळे सरकारसमोर आव्हाने उभी राहू शकतात, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. मात्र, पुढील दोन ते पाच महिन्यांत नेमकी कोणती घडामोड घडेल, याबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला नाही.


