मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. बीड जिल्ह्यातील नारायणगड येथील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शिंदे यांना थेट सवाल करत भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “मनोज जरांगे, बेईमान माणसा, एकनाथ शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख! एकनाथ शिंदे आमचं दैवत आहेत. जरांगे, तू आहेस कोण?” अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला.
‘शिंदेंना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही!’
रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जरांगे पाटील, आम्ही आजपर्यंत तुमच्या विरोधात कधीही बोललो नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही उपोषणाला बसता, त्यालाही आम्ही कधी विरोध केला नाही. मात्र, आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आणि ५०० कोटी रुपयांबाबत बोलला आहात. एकनाथ शिंदे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज गप्प बसणार नाही.”
जरांगे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत कदम यांनी, “तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे. अरे, तू आहेस कोण? असा सवालही केला.
‘पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलण्याची ही कोणती संस्कृती?’
मनोज जरांगे यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरही रामदास कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलण्याचा अधिकार जरांगेंना कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला.
“पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना एकेरी बोलणार, अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस का? ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? समाजाने तुला न्यायासाठी पाठिंबा दिला; मात्र त्या पाठिंब्याचा गैरफायदा घेतला जात आहे का, याचा विचार करायला हवा,” असे कदम म्हणाले.
जरांगे यांच्या आंदोलनाला समाजाने पाठिंबा दिला असला, तरी त्या पाठिंब्याच्या जोरावर राजकीय नेत्यांवर आरोप करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘शिंदे, कदम, भोसले लाचार नाहीत!’
रामदास कदम यांनी मराठा समाजातील नेत्यांचा उल्लेख करत जरांगे यांच्यावर निशाणा साधला. “शिंदे, कदम आणि भोसले हे मराठा आहेत; पण ते तुमच्यासारखे लाचार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. ज्या गावात उपोषण केले, त्या गावानेच त्यांना हाकलून दिल्याचा दावाही कदम यांनी केला.
‘एकनाथ शिंदे देणारे आहेत, घेणारे नाहीत!’
५०० कोटी रुपयांच्या आरोपावरून रामदास कदम यांनी जरांगे यांना थेट लक्ष्य केले. “याद राखा, एकनाथ शिंदे दोन-दोन हातांनी देणारे आहेत, घेणारे नाहीत. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघाला आहात का?” असा सवाल त्यांनी केला.
तसेच, “यापुढे तुमची गाठ मराठा समाजाशी आणि शिवसैनिकांशी आहे,” असा इशाराही कदम यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र
मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगड येथील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रुपयांचा उल्लेख करत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्याला रामदास कदम यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्याभोवतीचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
जरांगे यांच्या आरोपांवरून शिंदे समर्थक आक्रमक झाले असून, कदम यांच्या इशाऱ्यामुळे या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, ५०० कोटी रुपयांच्या उल्लेखासंदर्भातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.


