नागपूर प्रतिनिधी
नागपूर : समाजातील समस्यांवर आंदोलने होणे स्वाभाविक आहे; मात्र, आंदोलनांचा वापर सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी होऊ नये. आंदोलनांमधून समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, समाजात द्वेष आणि विसंवाद निर्माण होता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, इस्रायलचे राजदूत यानिव रेवाच, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके उपस्थित होते.
आंदोलनात संविधान आणि कायद्याचे पालन आवश्यक
सामाजिक समस्यांविरोधात आवाज उठविणे ही जुनी परंपरा आहे. मात्र, शासन-प्रशासन, आंदोलनकर्ते आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या कृतीतून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आंदोलन करताना संविधान आणि कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे. बोलताना, वागताना आणि परस्परांशी व्यवहार करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. सवंग लोकप्रियता आणि राजकीय लाभाच्या हव्यासापोटी विवेक व सद्भावना बाजूला पडता कामा नये, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय एकात्मता ही प्रत्यक्ष जीवनात उतरावी
भारतीय संविधानाने ‘आम्ही भारताचे लोक’ या भावनेतून देशातील नागरिकांना एकत्र बांधले आहे. भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार करून भावनिक एकात्मता अधिक दृढ करणे आवश्यक आहे. भारतीय तत्त्वज्ञान विविधतेत एकात्मतेचा विचार मांडते. हा विचार केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजजीवनात उतरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी संघर्ष आणि बलिदान दिले. आता राष्ट्राच्या सर्वांगीण उभारणीसाठीही तितकीच बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. राष्ट्रीय एकात्मता, परस्परांचा आदर आणि सामाजिक सद्भावना या देशाच्या प्रगतीच्या महत्त्वाच्या आधारशिला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डिजिटल माध्यमांच्या वापरात विवेक हवा
समाजमाध्यमे, डिजिटल व्यासपीठे आणि ओटीटी माध्यमांमधून माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. मात्र, उपलब्ध माहितीचा योग्य-अयोग्य असा विचार न करता स्वीकार केल्यास त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी चिंता डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
कुटुंब, शाळा आणि सामाजिक वातावरणातून नव्या पिढीला मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व कमी होता कामा नये. तरुणांना माहितीचे चिकित्सक मूल्यमापन करण्याची सवय लावणे, योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगणे आणि तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर शिकविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमली पदार्थांविरोधात व्यापक जनआंदोलन उभारणार
तरुण पिढीतील वाढती व्यसनाधीनता ही गंभीर राष्ट्रीय समस्या बनली आहे. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन, पालक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांनी तरुणांना योग्य-अयोग्याची जाणीव करून द्यावी, तर तरुणांनी व्यसनाधीनतेकडे नेणाऱ्या प्रवृत्तींपासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही; त्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामाजिक सहभाग आवश्यक आहे. देशभरातील संबंधित घटकांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.


